Wednesday, August 31, 2022

मी येतोय

  

     हो... हो मला समजते आहे तुमची आतुरता... माझ्या आगमनाचे वेध तुम्हाला लागले आहेत. होय ना? पृथ्वीतलावर मागील दोन वर्षे कोरोना नामक विषाणूजन्य रोगाचे थैमान चालू होते, त्यामुळे एक अस्वस्थपर्व त्यावेळी तुम्ही अनुभवले होते. मागील वर्षी तुम्ही मला कळकळीने विनंती केलीत की, 'या कोरोनारुपी विघ्नाचा नाश करा' आणि मी त्याचा नाश केला आहे. यावर्षी जल्लोषामध्ये माझे स्वागत होणार आहे असे दिसते आहे. ढोल, ताशे याच्या  निनादामध्ये माझी भव्य मिरवणूक निघणार आहे. आपली सर्व दुःखे, वेदना, क्लेश बाजूला सारून माझे जोशात आगमन होणार आहे. यावर्षी कोणता देखावा उभा करायचा?  कोणते कार्यक्रम करायचे? या सर्वांचे नियोजन कार्यकर्त्यांमध्ये चाललेले मला दिसत आहे.

          दहा दिवस माझ्यासाठी कोणते  नैवेद्य करायचे? याचे नियोजन तुम्ही आखत आहात ते मला दिसते आहे. माझ्याभोवती मखर कसे करावे?  आरास कशी करायची? याच्या विविध कल्पना तुमच्या डोक्यात घोळत आहेत हे मला दिसते आहे. एकंदरीत,  नवचैतन्याचे,  आनंदाचे, उत्साहाचे, लगबगीचे,  वातावरण तयार होताना मला जाणवते आहे. पूर्ण श्रावणभर तुम्ही माझ्या वडिलांचे म्हणजेच भगवान शंकरांचे *शिवलीलामृत पठण*  व्रत केले. आता मी आल्यावर माझे *स्तोत्र* व माझ्या *अथर्वशीर्षाचे* पठण होईल. होय ना? तुमच्या त्या डॉल्बीच्या मोठ्या व कर्णकर्कश्य आवाजापेक्षा,  तुमच्या मंजुळ आवाजात माझ्या आवडीच्या *स्तोत्र* व सर्व *गणपती अथर्वशीर्षाचे* पारायण केलेले मला खूपच आवडेल. कराल ना तुम्ही भक्तगण? मी पाहणार आहे.... तर भक्तगण हो, येतच आहे मी... माझ्यासाठी माझ्या आवडीचे *उकडीचे मोदक* तयार ठेवा. *गुळ - खोबऱ्याचा* नैवेद्य तयार ठेवा. तुमच्या गणेश भक्तीचा आस्वाद घेण्यासाठी मी लवकरच आगमन करतो आहे... तयारीत रहा...

*तुमचा लाडका बाप्पा*