Saturday, September 3, 2022

मला आलेली स्वामींची गोड अनुभूती

 


बऱ्याच वेळा मी असे वाचले आहे की, 'जर तुमचे ध्येय चांगले असेल आणि तुम्ही व्यक्त केलेल्या इच्छेतून जर एखाद्याचे चांगले होणार असेल आणि ती इच्छा तुम्ही स्वामी जवळ बोलला तर स्वामी ती नक्कीच पूर्ण करतात.' याची मला आजच स्वामींची एक गोड अनुभूती आली. त्याचे झाले असे, मी ओगलेवाडी, ता. कराड येथे राहतो. मला व्यायामाची आवड असल्याने मी जिममध्ये जातो. याच जिममध्ये माझा सचिन आहेर नावाचा एक मित्र आहे. जो सध्या माझा जिम पार्टनर ही आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी मी सचिनला विचारले होते की, "अरे आता चार दिवसातच गणपतीचे आगमन होणार आहे. काय मग?  गणपतीची तयारी, आरास वगैरे झाली की नाही?"  यावर तो नाराज होऊन म्हणाला की, " नाही रे मी इथे कामानिमित्त राहतोय. आमच्या मूळ गावी शेवगाव, अहमदनगर येथे घरी गणपती बसवला जातो. त्यामुळे मी इथे घरी गणपती बसवत नाही." त्याचे हे उत्तर ऐकल्यावर मला थोडेसे वाईट वाटले. माझ्या मनात असा विचार आला की, आता माझ्या घरी गणेशाचे आगमन होईल, घरात आनंदाचे वातावरण तयार होईल पण सचिनच्या घरी गणपती नाही. तो हा आनंद इच्छा असूनही अनुभव शकणार नाही. अशा विचारातच व्यायाम पूर्ण झाला.

जिममधून मी घरी आलो. रात्री मी अंथरुणावर पडल्यावरही माझ्या डोक्यात तोच विचार घोळत होता. त्याची माझी घट्ट मैत्री असल्याने व तो माझा जिवलग मित्र असल्याने त्याला हा आनंद अनुभवता येत नाही याचे शल्य माझ्या मनाला टोचत होते. मन काहीसे अस्वस्थ झाल्याने नीट झोप लागत नव्हती. शेवटी स्वामींना म्हणालो की, "आता तुम्हीच काय ते पहा." असे म्हणून मी कसेतरी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी कोपर्डे ता. कराड येथील स्वामी मठामध्ये मी गेलो. तिथे स्वामीदर्शन झाल्यानंतर नामस्मरणासाठी खाली बसलो. नामस्मरण झाले आणि अचानक रात्री घोळत असलेला विचार पुन्हा मनात आला. स्वामींकडे विनंतीपूर्वक नेत्र कटाक्ष टाकून मनातल्या मनात स्वामींपुढे इच्छा व्यक्त केली की, 'माझ्यासारखा सचिनच्याही घरी बाप्पा आले असते तर किती बरे झाले असते. पण हे कसे शक्य होईल? तो तर बसवता येणार नाही असे म्हणतोय" मी काहीसा उदास झालो. पुन्हा एकदा स्वामींकडे भरल्या नजरेने पाहिले. नमस्कार केला आणि तिथून थेट घरी आलो. गणेश चतुर्थी दिवशी गणपती येणार म्हणून जिमला सुट्टी होती. काही कामामुळे सचिनला दोन दिवस जिमला येणे शक्य झाले नाही. आज गणपतीचा तिसरा दिवस. आज तो जिमला आला होता.

जिममध्ये आल्या आल्या तो मला म्हणाला की, "अरे महेश गणपती आहे तोपर्यंत मला तुझ्या बागेतील फुले मिळतील का?" मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि त्याला विचारले की, "का रे?"  तेव्हा त्याने जे मला उत्तर दिले ते उत्तर ऐकून मी चकित झालो. तो म्हणाला, "अरे गणेश चतुर्थीच्या दिवशी इतरांच्या घरी गणपती आले बघून माझी साडेचार वर्षांची मुलगी आर्या हट्टालाच पेटली व म्हणाली की सगळेजणांनी आपल्या घरात बाप्पाला आणले आहे, मग आपणच का नाही? आपणही आणायचा बाप्पा. मी तिला किती समजावले पण ती ऐकायलाच तयार नाही. तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती. बाप्पाला आणल्याशिवाय मी जेवणारच नाही असे म्हणाली. मग काय करणार? दुपारी दोन वाजता कराडात जाऊन बाप्पांची मूर्ती आणून घरात प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हा कुठे ही पठ्ठी साडेतीन-चारला जेवली. आता बोल" त्याचे हे उत्तर ऐकून माझे डोळे भरून आले. स्वामींच्या मठाच्या दिशेकडे पाहून हात जोडले आणि मनातल्या मनात म्हटले, "स्वामी, मी इच्छा काय व्यक्त केली आणि तुम्ही ती पूर्ण केलीत? खरंच, तुम्ही स्मर्तृगामी आहात." इकडे माझे डोळे भरलेले पाहून सचिन गोंधळला.

मी हात जोडलेले पाहून त्याने मला विचारले की,  " महेश, कुणाला नमस्कार करतोयेस? काय झाले?"  तेव्हा मी त्याला म्हणालो की, "तुझ्या घरात गणपतीचे आगमन व्हावे ही माझी कळकळीची इच्छा होती आणि ही इच्छा स्वामींनी पूर्ण केली. त्यामुळे आता बाप्पांच्या आगमनाचा तुलाही आनंद मिळणार आहे आणि तुझ्याही घरात गणपती आला आहे त्यामुळे मलाही आनंद झाला आहे. तू गणेश आगमनाच्या व गणेशाच्या दहा दिवसांच्या वास्तव्याच्या आनंदापासून वंचित राहू नये असे मला मनोमन वाटते. मला जसे हवे होते अगदी तसेच स्वामींनी घडवले." हे ऐकून त्यालाही आश्चर्य वाटले आणि त्यानेही स्वामींना हात जोडले.🙏 खरंच.. स्वामी तुमची लीला अगाध,  अगम्य आहे. या गोड अनुभूतीने तुम्ही मला कृतकृत्य केलेत आणि तुमच्यावरील माझी श्रद्धा अधिकच दृढ झाली आहे... 🙏

बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी - गणपतीच्या सणाला



तो साधारण ५० - ६० वर्षांपुर्वीचा काळ असेल. दळणवळणाची साधने पुरेशी उपलब्ध नव्हती. खेडी अजून वैचारिकदृष्ट्या सुधारली नव्हती. खेडेगावातील स्त्रीजीवन अत्यंत बिकट व खडतर होते. संसार, चुल आणि मूल यात बाईचे जीवन गुरफटून गेले होते. सोबत सासू - सासरे, नणंद आणि नवरा यांचा जाच - छळ ठरलेला असायचा. हुंडा, मानापमान, सासरकडून दबाव या गोष्टींखाली स्त्रीजीवन दबले गेले होते. थोडक्यात, स्त्रीजीवन त्याकाळी तणावात जगत होते. अशावेळी माहेरची ओढ लागणे स्वाभाविक होते. रक्षाबंधन, गौरी - गणपती, भाऊबीज हे सण म्हणजे स्रीजीवनातील एक आनंदोत्सव असे. अशावेळी भावाला सासरी बहिणीला आणण्यासाठी धाडले जायचे. प्रत्येक सासरवाशीण माहेरहून येणाऱ्या आपल्या लाडक्या भावाच्या वाटेकडे डोळे लावून बसते असे. कधी एकदा बैलगाडीच्या घुंगरांचा तो सुखद आवाज कानावर पडतो असे होई. त्यावेळी माहेरी जाण्यास आतुर असलेली स्त्री मनाशी गुणगुणत असे, 

"बंधू येईल माहेरी न्यायला

गौरी गणपतीच्या सणाला

गाडी घुंगराची येईल न्यायला

गाडी घुंगराची येईल न्यायला

गौरी गणपतीच्या सणाला"

Wednesday, August 31, 2022

मी येतोय

  

     हो... हो मला समजते आहे तुमची आतुरता... माझ्या आगमनाचे वेध तुम्हाला लागले आहेत. होय ना? पृथ्वीतलावर मागील दोन वर्षे कोरोना नामक विषाणूजन्य रोगाचे थैमान चालू होते, त्यामुळे एक अस्वस्थपर्व त्यावेळी तुम्ही अनुभवले होते. मागील वर्षी तुम्ही मला कळकळीने विनंती केलीत की, 'या कोरोनारुपी विघ्नाचा नाश करा' आणि मी त्याचा नाश केला आहे. यावर्षी जल्लोषामध्ये माझे स्वागत होणार आहे असे दिसते आहे. ढोल, ताशे याच्या  निनादामध्ये माझी भव्य मिरवणूक निघणार आहे. आपली सर्व दुःखे, वेदना, क्लेश बाजूला सारून माझे जोशात आगमन होणार आहे. यावर्षी कोणता देखावा उभा करायचा?  कोणते कार्यक्रम करायचे? या सर्वांचे नियोजन कार्यकर्त्यांमध्ये चाललेले मला दिसत आहे.

          दहा दिवस माझ्यासाठी कोणते  नैवेद्य करायचे? याचे नियोजन तुम्ही आखत आहात ते मला दिसते आहे. माझ्याभोवती मखर कसे करावे?  आरास कशी करायची? याच्या विविध कल्पना तुमच्या डोक्यात घोळत आहेत हे मला दिसते आहे. एकंदरीत,  नवचैतन्याचे,  आनंदाचे, उत्साहाचे, लगबगीचे,  वातावरण तयार होताना मला जाणवते आहे. पूर्ण श्रावणभर तुम्ही माझ्या वडिलांचे म्हणजेच भगवान शंकरांचे *शिवलीलामृत पठण*  व्रत केले. आता मी आल्यावर माझे *स्तोत्र* व माझ्या *अथर्वशीर्षाचे* पठण होईल. होय ना? तुमच्या त्या डॉल्बीच्या मोठ्या व कर्णकर्कश्य आवाजापेक्षा,  तुमच्या मंजुळ आवाजात माझ्या आवडीच्या *स्तोत्र* व सर्व *गणपती अथर्वशीर्षाचे* पारायण केलेले मला खूपच आवडेल. कराल ना तुम्ही भक्तगण? मी पाहणार आहे.... तर भक्तगण हो, येतच आहे मी... माझ्यासाठी माझ्या आवडीचे *उकडीचे मोदक* तयार ठेवा. *गुळ - खोबऱ्याचा* नैवेद्य तयार ठेवा. तुमच्या गणेश भक्तीचा आस्वाद घेण्यासाठी मी लवकरच आगमन करतो आहे... तयारीत रहा...

*तुमचा लाडका बाप्पा*